तो एक नवतरुण.
नवनवीन विचारांनी भारावलेला.
नुकतेच शिक्षण आटोपून, परत आपल्या माणसात आलेला.
प्रत्येक गोष्ट तार्कीकतेच्या कसोटीवर घासून पहायची सवयच लागलेला.
आपल्यातील अनेक गोष्टीत सुधारणा करायला भरपूर वाव असला तरी आपलीच माणसे आहेत, समजून घेतीलच आपल्याला, अशी त्याची खात्री होती.
चांगल्या कामाची सुरुवात नेहेमी देवापासून करावी म्हणतात.
त्यानेही केली.
तो विचारी, कशावरून नारळातील पाणी ही देवाची करणी?
कधी उठतो-निजतो देव? का करायची काकड-आरती, शेजारती? कोण ठरवतो त्याने किती झोपावे?
तो म्हणे, माणसाने नेहेमी
कशावरून?
कधी?
का?
किती?
कुठे?
केव्हा?
कोण? ………अशी ‘क’ची बाराखडीच विचारावी?
मग एक दिवस सख्ख्या भावानेच त्याला विचारले कशावरून तू माझ्या बापाचाच?
आणि त्याला आयुष्यातूनच वजा केले.